नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी अधिकृत वेबसाइट सुरू
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय तयारी वेगाने सुरू झाली असून, या पवित्र महोत्सवासाठी एक नवीन अधिकृत वेबसाइट लाँच करण्यात आली आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भाविकांना कुंभमेळ्याशी संबंधित सर्व अचूक आणि प्रमाणित माहिती एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे. गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर या वेबसाइटच्या माध्यमातून तयारीला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.

या अधिकृत वेबसाइटचा मुख्य उद्देश भाविक, सरकारी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक संस्था, पर्यटन आणि वाहतूक कंपन्या तसेच माध्यमांना एकाच व्यासपीठावर सर्व माहिती देणे हा आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या स्रोतांवर माहिती शोधण्याची गरज भासणार नाही. कुंभमेळ्याला भेट देणार्या लोकांसाठी हा डिजिटल मार्गदर्शक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
वेबसाइटवरील प्रमुख वैशिष्ट्ये आणि सेवा
आगामी काळात या वेबसाइटवर कुंभमेळ्याशी संबंधित विविध डिजिटल सेवा आणि माहितीचे टप्प्याटप्प्याने विस्तारीकरण केले जाईल. यामध्ये प्रमुख स्नान पर्वणींच्या तारखा आणि वेळा, अधिकृत घोषणा, धार्मिक स्थळे, तसेच प्रवासाच्या सुविधांची सविस्तर माहिती समाविष्ट असेल.
- महत्त्वाच्या स्नानांच्या तिथी आणि वेळेची अचूक माहिती
- नाचिके आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख मंदिरे, घाट आणि अखाड्यांचा इतिहास व महत्त्व
- रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने प्रवास करण्याचे पर्याय आणि स्थानिक वाहतूक सुविधा
- वैद्यकीय मदत केंद्रे, हॉस्पिटल्स, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, स्वच्छतागृहे आणि पार्किंगची माहिती
- आणीबाणीच्या वेळेस संपर्क साधण्यासाठी महत्त्वाचे क्रमांक आणि सार्वजनिक सुरक्षा मार्गदर्शक सूचना
प्रशासन आणि जनतेचे सहकार्य
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वांना विशेष प्राधान्य दिले गेले आहे. कुंभमेळ्याचे आयोजन हा अत्यंत व्यापक उपक्रम असून यात अनेक विभागांचा सहभाग असतो. प्राधिकरणाने सर्व संबंधित विभाग, जिल्हा प्रशासन, धार्मिक संस्था आणि प्रसारमाध्यमांना या अधिकृत वेबसाइटची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून नागरिकांपर्यंत केवळ खात्रीशीर माहितीच पोहोचू शकेल.


